आईचे भूत काढतो सांगत भोंदूबाबाने केले मुलीशी लग्न

पुणे : महिलेच्या अंगातील भूत काढण्याच्या ढोंग करत एक भोंदूबाबाने तिच्या मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये उघडकीस आला आहे. दरम्यान, पीडित मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली असून जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु अप्पा साळवे (वय-42, रा.घोरपडे पेठ, पुणे) असे भोंदुबाबाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोंदूबाबा राजू साळवे हा लाईट फिटिंगची कामे करतो. संबंधित मुलीच्या घरी लायटिंगचे काम करण्यास गेला असता त्याला मुलीची आई आजारी असल्याचं दिसले, याचा फायदा घेत त्याने भूत उतरवण्यासाठी मुलीला दिवशी लग्न करावे लागले असा बनाव केला. तसेच आजारी महिलेच्या कुटुंबाला मांढरदेवीला घेऊन जात मुलीशी लग्न केले. इतक्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीला आपला विवाह झाल्याचे कागदावर लिहीण्यास भाग पाडले आणि ती चिठ्ठी स्वत:जवळ ठेऊन तिच्याकडे शारिरीक सुखाची मागणी केली. या सर्व घटनेनंतर पीडित मुलीला संशय आल्याने तिने खडक पोलिसात फिर्याद दिली.

पीडित मुलगी ही उच्चशिक्षीत असून तिने पुण्यातील एका महाविद्यालयातून एमएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर आरोपी हा अविवाहीत असून तो आईसोबत राहतो. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने अशाप्रकारचे यापुर्वीही काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास करत आहेत. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के करीत आहेत.