बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवणार : अजित पवारांचा आदेश

ajit pawar pcmc

पुणे : एका कोरोनाग्र्स्त भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीत भिलवाडा पॅटर्न राबवण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता संपूर्ण बारामती शहर सील करण्यात येणार असून केवळ अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी असणार आहे. बारामतीमधील करोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचल्त्याने परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी अजित पवारांनी भिलवाडा पॅटर्न राबवण्याचे आदेश दिले आहेत.

बारामतीत कोरोनाबाधित भाजीविक्रेत्याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता त्याच्या कुटुंबातील दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर प्रशासनाकडून कठोर पावलं उचलत पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर आता बारामतीत घरोघरी जाऊन सर्वच कुटुंबांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील लोकांची तीन वेळा तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, संपूर्ण शहरात नाकाबंदी असून कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच जर कोणीही बेजबाबदारपणे बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाईदेखील केली जाणार आहे. त्याचप्रमाणे जीवनाश्यक वस्तू लोकांना घरपोच केल्या जाणार आहेत. नागरिकांना नियमाचं पालन करत भाजी, किराणा, औषध या वस्तू ऑर्डरप्रमाणे घरपोच केल्या जाणार आहेत. नागरिकांना प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर देण्यात आला असून यावरही कंट्रोल रुमची नजर असणार आहे. सोबतच एखाद्या कुटुंबात निधन झाल्यास कमीत कमी लोकांमध्ये अंत्यसंस्कार पार पाडण्याचा आदेश आहे.