महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला – जयंत पाटील

महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला – जयंत पाटील

गणपतराव देशमुख

मुंबई   – गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहेच. शिवाय त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह आज हरपला अशा शब्दात आपल्या शोक भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत घालवला. एकाच विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी तो निष्ठेने आयुष्यभर सांभाळला. विधिमंडळात आबासाहेब बोलायला उभे राहिले कि सगळे सभागृह शांत होऊन ऐकायचे याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या शोक संदेशात ते म्हणतात, एका पर्वाचा अंत झाला! जनतेचा इतक्या दिर्घकाळ विश्वास असलेला आणि प्रवाहाच्या विरोधात जाऊन ही विचारांचे राजकारण करणारा असामान्य आदर्श चारित्र्यसंपन्न नेता पुन्हा होणे नाही. उभ्या महाराष्ट्राला या सुपुत्राची उणीव कायम भासत राहील. गणपतराव देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.

महत्त्वाच्या बातम्या