भीमा कोरेगाव हिंसाचार; मेवाणी, खालिदवर पोलीसांची मेहरबानी का?

पुणे – भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यावर विविध आंबेडकरवादी आणि डाव्या संघटनाकडून एल्गार परीषदेच आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल उसळली होती.या दंगलीला एल्गार परिषदेत विविध वक्त्यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्येच जबाबदार आहेत असा आरोप करत पुण्यातील एका युवकाने २ जानेवारी २०१८ रोजी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्या विरोधात डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली होती प्राथमिक तपासा अंती पोलिसांनी तक्रारीची दखल घेत FIR नोंदवून घेतली.

FIR दाखल करून जवळपास चार महिने लोटले तरीही पुणे पोलिसांकडून उभयतांवर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र देशाने तक्रारदार तरुण अक्षय बिक्कड याची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता तो म्हणाला कि, “एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणं आणि त्यानंतर राज्यभर उसळलेला हिंसाचार याच्या विरोधात एक सजग नागरिक म्हणून मी पोलिसात रीतसर तक्रार देऊन आणि FIR दाखल करून मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे,

या पुढचं काम पोलीस आणि सरकारी यंत्रणांनी करायचं आहे त्यात ते कसूर करत आहेत. मी वारंवार तपासाचा फोलोअप घेत आहे परंतु मी बाहेरून पुण्यात शिक्षणास आलेला कसलंही पाठबळ नसलेला एक सामान्य विद्यार्थी आहे, म्हणून मला माझ्या मर्यादा आहेत.तक्रार दाखल केली तेव्हा मला मोठ्या प्रमाणावर धमक्या, मित्रांचा आणि परिवाराचा विरोध आणि मानसिक त्रासातून जावं लागलं परंतु मी माझ्या मतावर ठाम राहिलो परंतु पोलिसांनी एकंदर तपासात दाखवलेली उदासीनता पाहून हे सर्व निरर्थक वाटत आहे. यापुढे समाजातील दुष्प्रवृत्ती विरोधात कोणताही नागरिक पुढे येताना हजार वेळा विचार करेल.”

दरम्यान अक्षय बिक्कड याने महाराष्ट्र देशाला दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर याठिकाणी काही प्रश्न निर्माण होतात. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सर्वात प्रथम जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. मात्र घटनेला चार महिने उलटूनही अद्याप पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे भीमा कोरेगावशी संबंधित एका गटाने मिलिंद एकबोटे यांना या हिंसाचाराला जबाबदार धरून अटकेची मागणी करताच त्यांना अटक झाली होती.मग प्रशासन खालिद आणि मेवाणी यांच्याबाबत इतके गाफील का? तसेच या गटाकडून संभाजी भिडे यांच्या देखील अटकेची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. महाराष्ट्र देशाने याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी तपास सुरु असल्याचं सांगितले.