कोरेगाव-भीमा प्रकरण : ४४ आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात

टीम महाराष्ट्र देशा :  कोरेगाव-भीमा येथील घटनेनंतर औरंगाबाद शहरात दगडफेक, जाळपोळ तसेच पोलिसांवर हल्ले करणाऱ्या आरोपींना गुरुवारी (४ जानेवारी) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी ४४ आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात झाली. तसेच इतर आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

शहर परिसरात मागील तीन दिवसांपासून विविध घटनांत पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यातील एकूण ४८ आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले. जवाहरनगर पोलिसांनी बुधवारी (३ जानेवारी) राजू पुंडलिक भिसे (२८), आकाश सुरेश रगडे (१९), सचिन रतन वाहूळकर (२६, सर्व रा. इंदिरानगर, गारखेडा) संदीप प्रभू कवडे (१८) यांना अटक केली होती. आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना शनिवारपर्यंत (६ जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले. त्याशिवाय तीन महिला आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. तीन पुरुष आरोपींना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.

कोरेगाव-भीमाच्या घटनेनंतर शहरातील विविध ठिकाणी दगडफेकीच्या ५० घटना घडल्या. यात पोलिसांची १७ तर इतर १०० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड झाली. याशिवाय तीन अ‍ॅम्ब्युलन्सचेही नुकसान करण्यात आले. याशिवाय आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली होती. यात ४४ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी विविध ठाण्यात तब्बल ४० गुन्हे नोंदवून आतापर्यंत ७४ जणांना अटक केली होती.

You might also like
Comments
Loading...