fbpx

आता ‘भीम आर्मी’ घेणार पुण्यात ‘भीमा कोरेगाव संघर्ष महासभा’

टीम महाराष्ट्र देशा : ‘भीम आर्मी’तर्फे भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पुण्यात ‘भीमा कोरेगाव संघर्ष महासभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे संबोधित करणार असून ३० डिसेंबर रोजी ही महासभा होणार आहे. या सभेकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भीम आर्मीतर्फे पुण्यात भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. भीम आर्मीचे पुण्यातील जिल्हाध्यक्ष दत्ता पोळ यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ३० डिसेंबर रोजी एसएसपीएमएस मैदानात भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची सभा होणार आहे.या सभेनंतर ३१ डिसेंबर रोजी चंद्रशेखर आझाद हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना ‘आंबेडकरी चळवळ’ या विषयावर संबोधित करणार आहे. ‘संवाद आंबेडकरी तरुणांशी’ असे या चर्चासत्राचे नाव आहे.