दंगल प्रकरणात भिडे गुरूजींचा काहीही संबंध नाही; आंबेडकरांनी गुरुजींची माफी मागावी – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

sambhaji bhide guruji

सातारा: भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिनी घडलेली घटना ही पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी कनेक्शन असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी भिडे गुरुजींचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण साता-यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आले.

सातारा पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला श्री शिवप्रतिष्ठाचे प्रवक्ता व सहजिल्हा कार्यवाहक सागर आमले, काशिनाथ शेलार, जिल्हा कार्यवाहक सतीश ओतारी उपस्थित होते.

आरोप खोटे; गुरुजींचा सहभाग नाही
सागर आमले म्हणाले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना देश, देव, धर्म यासाठी तरुणांच्या मनामध्ये जागृती व भक्ती निर्माण करण्याचे कार्य अनेक वर्षे अव्याहतपणे करत आहे. संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गडकोट मोहिमा, दुर्गामाता दौड यासरखे देशभक्तीचे, धर्मभक्तीचे कार्यक्रम राबविले जातात. या कार्यात महाराष्ट्रातील सर्व अठरापगड जातींचे तरुण सहभागी असतात. देशभावनेने कार्य सुरु असताना प्रतिष्ठानवर खोटे आरोप केले जात आहेत. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतूनच या दंगलीला चिथावणी देण्यात आली. ही दंगल पूर्वनियोजित होती. जिग्नेश मेवानी या बाहेरील नेत्याचा येथे काय संबंध होता. घडल्या प्रकारामध्ये गुरुजींचा अर्थाअर्थी संबंध नाही. गुरुजींनी सदर प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातलेले नाही. कोठे सभा घेतली नाही, कोणतेही आवाहन केलेले नाही, वक्तव्य केलेले नाही. ते त्यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक झाल्याने सांत्वनासाठी ईश्वरपूर (इस्लामपूर) येथे गेले होते. असे असताना त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल करण्यात आला.

प्रतिष्ठानचे कार्य सहन होत नसल्यानेच त्यांचे नाव गोवण्याचा प्रकार करण्यात आला आहे. आंबेडकरांचे नक्षल कनेक्शन प्रकाश आंबेडकर यांना आमच्या प्रतिष्ठानचे नाव नीट माहित नाही त्यामुळे भिडे गुरुजींबद्दल माहितीच नसणार. त्यांचा बोलविता धनी कोण आहे याची चौकशी करावी. भीमा कोरेगाव येथील शौर्य दिन कार्यक़्रमाचा संयोजक अनंत तेलतुंबडे असून तो प्रकाश आंबेडकर यांचा मेहुणा आहे. त्याचा भाऊ मिलींद तेलतुंबडे हा माओवादी असून नक्षलवाद्यांचा म्होरक्या आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. देशात अस्थिरता माजवण्याचा प्रकार असून प्रकाश आंबेडकर यांच्या नक्षल कनेक्शनची चौकशी करावी.

गुरुजींची माफी मागा
ज्या माणसाने गोल्ड मेडलिस्ट असताना पायात चप्पल घातली नाही, देश-देव-धर्मासाठी आयुष्य वाहिले त्या ॠषीतुल्य व्यक्तीमत्त्वावरचे आरोप सहन केले जाणार नाहीत. आंबेडकरांनी गुरुजींची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात रान उठवले जाईल, असे सतीश ओतारी यांनी सांगितले. बंद काळातील नुकसान भरपाई भारिपकडून वसूल कराभीमा-कोरेगाव येथील घटनेनंतर भारिप बहुजन महासंघाकडून जो बंद पुकारण्यात आला तो बेकायदेशीर असून या काळात समाजाचे जे काही नुकसान झाले ते भारिप बहुजन महासंघाकडून वसूल करावे, अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे काशिनाथ शेलार यांनी सांगितले.तेढ निर्माण करून पोळी भाजण्याचा प्रकारया प्रकरणात जाणिवपूर्वक तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेत असून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, यामागील सूत्रधाराचा छडा लावून सामाजिक वातावरण शुद्ध व निकोप रहावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. शिवाय उद्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक प्रांत व तहसील कार्यालयात प्रतिष्ठानच्यावतीने निवेदनही देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.