भाऊसाहेब माझ्यावर खुप प्रेम करायचे…तुपकरांनी जाग्या केल्या आठवणी !

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आज दुख:द निधन झालं. ते 67 वर्षांचे होते.  हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना आज पहाटे मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने राज्याने एक मोठ राजकीय नेतृत्व गमावल्याची भावना आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भाऊसाहेब फुंडकर यांच्या सोबतच्या आठवणी जाग्या केल्या.

रविकांत तुपकर यांनी लिहिलेला शोकसंदेश 

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे भुमिपुत्र स्व्. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने जिल्हयाचेच नव्हे तर, राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. भाऊसाहेब एक संवेदनशिल नेते होते.  कार्यकर्ता म्हणून भाऊसाहेब माझ्यावर खुप प्रेम करायचे. अलिकडच्या काळात सरकारच्या विरोधात आम्ही आक्रमक भुमिका घेत असतानाही त्यांनी कधीही मला हटकले नाही. ते मुळात शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतीप्रश्नाची जाण होती. सर्वच राजकीय पक्षाशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. स्व्. गोपीनाथ मुंढे साहेबानंतर बहुजन समाजाला सोबत घेवून चालणारे ते नेते होते. माझ्या राजकीय आयुष्यात मला नेहमीच त्यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यकर्त्यांना जपणारा व बळ देणारा नेता म्हणून भाऊसाहेबांची ख्याती होती.

मी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार हे जेव्हा त्यांना कळाले तेव्हा राजीनामा देवू नका म्हणून त्यांनी माझी खुप मनधरणी केली होती. विशेष म्हणजे मला महामंडळाचे अध्यक्ष करण्यासाठी भाउसाहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे माझी शिफारसही केली होती. चार दिवसापूर्वीच खा. राजू शेटृी व मी मंत्रालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना भेटलो. शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनमोकळी चर्चा झाली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. विदर्भातील शेती कोरडवाहू आहे, त्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलने करतांना भाऊसाहेबांच्या विरोधातही आम्हाला आंदोलने करावी लागली. मात्र त्यांनी कधीच वाईट वागणूक आम्हाला दिली नाही, फक्त् माझी भुमिका समजून घ्या असा मला त्यांचा नेहमी आग्रह असायचा. त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक चढउतार आले पण त्यांनी पक्षनिष्ठा कधीच ढळू दिली नाही. चळवळी नेहमी टिकल्या पाहिजे अशी त्यांची कायम भुमिका होती. त्यांच्या अचानक जाण्याने बुलडाणा जिल्हयासह महाराष्ट्राचे राजकीय क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे.

आपला
रविकांत तुपकर
प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी पक्ष,महाराष्ट्र राज्य