आम्ही पकडलेले लोकच सतीश शेट्टींचे मारेकरी – भाऊसाहेब आंधळकर

सच परेशान हो सकता है, हार नही सकता

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयने १३ एप्रिल रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांच्या न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. क्लोजर रिपोर्ट सादर करत असताना खून प्रकरणात नवीन पुरावे मिळत नसल्याचे कारण सीबीआयकडून देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले पुणे ग्रामीण एलसीबीचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि सहायक पोलीस निरीक्षक नामदेव कवठाळे यांना क्लीन चीट देण्यात आल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तळेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची १३ जानेवारी २०१० मध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी विजय दाभाडे, शाम दाभाडे, प्रमोद वाघमारे, नवनाथ शेलार, डोंगरे राठोड यांना अटक केली होती. दरम्यान, खुनाच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार सतीश यांचे भाऊ संदीप शेट्टी यांच्याकडून करण्यात आली.

पुढे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. तपासाअंती २०१४ मध्ये सीबीआयने केस बंद केली. त्यानंतर सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात संदीप शेट्टी यांनी मुंबई हायकोर्टमध्ये याचिका देखील केली, हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरु करण्यात आला. यावेळी सीबीआयने आयआरबीचे प्रमुख वीरेंद्र म्हैसकर यांच्यासह सहा जणांची न्यायालयात नावे दाखल केली होती. दरम्यान, आता आता क्लोजर रिपोर्ट सादर करत असताना आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर यांना क्लीन चिट देत नवीन पुरावे मिळत नसल्याचे कारण सीबीआयकडून देण्यात आले आहे.

सीबीआयकडून सादर करण्यात आलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे आपल्याला क्लीन चीट मिळाल्याचा दावा भाऊसाहेब आंधळकर यांनी केला आहे, हा दावा करत असताना त्यांनी क्लोजर रिपोर्ट आणि त्यांनी केलेल्या तपासाचे दाखले दिले. यामध्ये सतीश शेट्टी यांच्या हत्येपूर्वी त्यांनी विजय दाभाडे आणि त्यांच्या पत्नीला तडीपार करण्याचा अर्ज पोलीस अधीक्षकांना केला होता, मात्र, संदीप शेट्टी यांनी आम्ही पकडलेला आरोपी विजय दाभाडे आणि सतीश शेट्टी यांचे वाद एक वर्षापूर्वी मिटल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिल्याचा आरोप आंधळकर यांच्याकडून करण्यात आला आहे.. तसेच सीबीआयने दिलेल्या क्लोजर रिपोर्टमुळे आम्ही पकडलेले लोकच सतीश शेट्टींचे मारेकरी असल्याचा दावाही त्यांनी केला.

You might also like
Comments
Loading...