मोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या सोयीनुसार पक्षांतर केले आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांनी देखील राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी भारती पवार म्हणाल्या की, विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला असून देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तसेच आज मला मोठा परिवार मिळाला असून यामुळे मला प्रेरणा मिळेल. भाजप हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री आहे. दिंडोरीमध्ये अनेक वर्षे कामं करून देखील न्याय मिळाला नाही.अशी खंत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान भारती पवार या शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या माजी मंत्री ए. टी.पवार यांच्या सुनबाई आहेत. त्या पेशानी डॉक्टर असून देखील राजकारणात त्या चांगल्याच सक्रीय आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही भारती पवारांनी राष्ट्रवादीकडून लढत देत लाखोंच्या घरात मते घेतली होती. त्यामुळे भारती पवार यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. तसेच भाजप कडून या लोकसभेला दिंडोरी मतदार संघातून भारती पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Loading...