भारत भालकेंनी घेतली फडणवीसांची वैयक्तिक भेट, तर थोरात विचारतात ‘भालके आहात कुठे?

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजप – सेने मध्ये प्रवेश करत आहेत. तर अनेक नेते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके हे देखील भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे. तर आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक भेट घेतली आहे. या भेटीनंतर भालके यांनी बाळासाहेब थोरातांची देखील भेट घेतली. त्यामुळे भालके यांच्या मनात नक्की आहे तरी काय ? अशी चर्चा रंगली आहे.

सह्याद्री अतिथीगृह इथं पूरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पण ही भेट घेऊन काँग्रेसचं शिष्टमंडळ परतल्यानंतरही आमदार भारत भालके हे मुख्यमंत्र्यांसोबतच राहिले. स्वतःची वैयक्तिक काम काम असल्याने ते स्वतंत्ररित्या मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत वैयक्तिक भेट घेऊन बाहेर आल्यानंतर भारत भालके यांची बाळासाहेब थोरांतांशीही भेट झाली. यावेळी ‘भालके आहात कुठे? आजकाल दिसत नाहीत’ असं म्हणत थोरातांनी गुगली टाकली. मात्र यावर आमदार भालके यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान गेले काही दिवस भारत भालके हे भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक भाजप नेते देखील त्यांच्याशी चांगलीच जवळीकता साधत आहेत. आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरच्या महापुजेला आले असता. त्यांनी भारत भालकेंच्या घरी पाहुणचार घेतला होता. त्यामुळे भारत भालके हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र याबाबत भालके यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.