fbpx

भारत बंद: अॅट्रोसिटीच्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणीस नकार

supreme-court-

टीम महाराष्ट्र देशा- अॅट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुर्नर्विचार याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. आज भारत बंद दरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसेचा हवाला देऊन 150 छोट्या मोठ्या दलित आणि आदिवासींच्या संघटनांच्या फेडरनेशनं याप्रकरणी तातडीनं सुनावणी करण्याची मागणी केली होती. प्रकरणाची सुनावणी योग्यवेळी घेण्यात येईल असं न्यायलयानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज संपूर्ण देशभरात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात या बंदला हिंसक वळण लागले असून ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको करण्यात आला आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून बंद दरम्यान आतापर्यंत देशभरात ६ जण ठार झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील चौघांचा तर यूपी आणि राजस्थानमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यात आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या गोळीबारात एकाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच जमाव आणखी आक्रमक झाला. शेवटी पोलिसांनी मुरैनात कलम १४४ लागू केला. यानुसार परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले. तर सागर व ग्वाल्हेर या भागातही जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठमध्येही जमावाने चार बसेस जाळल्या.

पंजाबमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असून तिथे शाळा, औद्योगिक कार्यालये बंद आहे. पंजाबमधील सीबीएसईचे दहावी आणि बारावीचे आज होणारे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.बिहारच्या फोरबीसगंज येथे आंदोलकांनी रुळावर उतरुन रेल रोको आंदोलन केले.राजस्थानच्या बारमेरमध्ये आंदोलकांनी गाडया पेटवून दिल्या, मालमत्तेचे नुकसान केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये गाडयांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.पंजाबच्या पितयाळामध्ये आंदोलकांनी ट्रेन रोखल्या.

नंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर तिकडे बिहारमध्ये रेले रोको करण्यात आला.