भारत बंद : हिंसाचार सुरूच, महिला माजी आमदाराच्या घराला समाजकंटकांनी लावली आग

टीम महाराष्ट्र देशा- अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाविरोधात भारत बंदादरम्यान सुरु असलेला हिंसाचार एका दिवसांनंतरही थांबताना दिसत नाहीये. कारण आता राजस्थानच्या करौली येथे समाजकंटकांनी दोन नेत्यांच्या घरांना आग लावल्याची माहिती आहे. जमावाने माजी भाजपा आमदार राजकुमारी जाटव आणि कॉंग्रेसचे माजी आमदार भरोसीलाल जाटव यांच्या घराला आग लावली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते दलित समाजाचे आहेत.

सोमवारी झालेल्या हिंसेनंतर येथे सकाळपासून पुन्हा गर्दी जमायला सुरूवात झाली. कलम 144 लागू केल्यानंतरही जवळपास 40 हजाराचा जमाव येथे जमला. हा जमाव काल झालेल्या हिंसेचा विरोध करत होता असं सांगितलं जात आहे. याच दरम्यान जमावाने दोन्ही नेत्यांच्या घरांना लक्ष्य केलं आणि आग लावली. एवढ्यावरच न थांबता जमावाने एका मॉलला देखील आग लावली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या.

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात काल संपूर्ण देशभरात विविध संघटना व राजकीय पक्षांद्वारे पुकारण्यात आलेल्या भारत बंद दरम्यान अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे.या आंदोलनाच्या आडून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्याची मध्यप्रदेशात हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. राहुल पाठक असं या युवा विद्यार्थी नेत्याचं नाव असून मोरेना येथील पीजी कॉलेजमधील अभाविप संघटनेचे सचिव म्हणून काम करत होते. सोशल मिडीयावर या हिंस्र आंदोलनाचा तसेच राहुल पाठक यांच्या हत्येचा मोठ्याप्रमाणावर निषेध व्यक्त केला जात आहे. दैनिक भास्करने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

मृत राहुल पाठक यांच्या नातेवाईकांनी मिडीयाला दिलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून राहुल यांची हत्या करण्यात आली आहे. राहुल आपल्या घराच्या बालकनीमध्य उभा असताना आंदोलकांमधून गोळीबार करण्यात आला . गोळी लागल्याने राहुल यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान,भारत बंदमुळे सोमवारी बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. या बालकाचा जन्म महानारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला होता. गंभीर अवस्था झाल्याने उपचारांसाठी त्याला हाजीपूरच्या सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. बालकाला घेऊन त्याची आई अॅम्ब्युलेन्सने हाजीपूरला गेली, परंतु महानारच्या आंबेडकर चौकात अॅम्ब्युलेन्सला बंद समर्थकांनी रोखले.नवजात अर्भकाला कडेवर घेऊन आई अॅम्ब्युलन्स वाट देण्याची विनवणी करत राहिली, परंतु तिचे कुणीही ऐकले नाही. आंदोलनामध्ये अॅम्ब्युलेन्स अडकून पडली आणि नवजाताचा मृत्यू झाला.

You might also like
Comments
Loading...