fbpx

पोलिसांना ऊर्जा देणारा ‘लायन्स’चा उपक्रम

पुणे : “गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस अहोरात्र बंदोबस्तात असतात. जवळपास ३० तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांना सकस आहार मिळावा, यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उभारलेले श्रमपरिहार केंद्र पोलिसांसाठी ऊर्जा देणारा उपक्रम आहे. या भोजनव्यवस्थेमुळे आमच्या पोलिस कर्मचाऱ्यांना, सुरक्षारक्षकांना आणि पोलिस मित्रांना बंदोबस्त करताना कुठलीही अडचण भासत नाही,” असे मत पोलिस उपायुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते झाले. गेल्या १४ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते. याप्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, आशा ओसवाल, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल, सचिव संतोष पटवा व खजिनदार दीपा गांधी, चेअरपर्सन कल्पेश पटनी यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फतेचंद रांका म्हणाले, ‘तीन हजार पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलिस मित्र आणि आणि रांगोळीच्या पायघडया घालणाऱ्या राष्ट्रीय कला अकादमीच्या तीनशे स्वयंसेवकांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ८०० ते १००० लोक जेवण करतात. घरगुती पोळ्या, भाजी, पुलाव व गुलाबजाम आदी पदार्थ यामध्ये असतात. रविवारी सकाळी ११ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ही भोजनव्यवस्था करण्यात आली.’

महापौर मुक्ता टिळक व अनेक नगरसेवकांनी पोलिसांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. समाजाच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात असलेल्या पोलिस व पोलिस मित्रांसाठी सामाजिक भावनेतून लायन्स क्लबने हा उपक्रम राबविल्याचे समाधान आहे, असे प्रांतपाल ला. रमेश शहा म्हणाले.

अहिल्यादेवी प्रशालेच्या ‘स्वच्छतेच्या नावानं चांगभलं’ एकांकिकेला प्रथम पारितोषिक…