केडगाव हत्याकांडात भानुदास कोतकरचा सहभाग : सीआयडी

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे :- महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या अहमदनगर मधील केडगाव येथील शिवसैनिक दुहेरी हत्याकांड प्रकरणात भानुदास कोतकरचा सहभाग असल्याचे सीआयडी तपासात समोर आले असून यासंदर्भात सीआयडीने न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. आरोपी भानुदास कोतकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून आरोपी पक्षाला अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात आला असून पुढील सुनावणी दि. १३ जूनला ठेवण्यात आली आहे.

केडगाव पोटनिवडणुकीनंतर दोन शिवसैनिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, तापसाअंती भानुदास कोतकरचे कनेक्शन उघड झाल्याने पॅरोलवर बाहेर असणाऱ्या कोतकरला सापळा लावून पुण्यातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सरकारी पक्षाने म्हणणे सादर केले आहे. यात कोतकरचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात लेखी म्हणणे सादर केले आहे. केडगाव दुहेरी हत्याकांडात भानुदास कोतकरचा हस्तक्षेप असल्याचे सबळ पुरावे हाती लागले असल्याचे त्यात म्हटले आहे. कोतकर याला सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात भानुदास कोतकर यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी भानुदास कोतकर हा न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावतीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. कोतकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर या आधी अनेक गुन्हे दाखल आहेत. कोतवाली पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात कोतकरला शिक्षा झालेली आहे. त्याच्याकडे पैसे आणि ताकद आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून याचा तपास सुरू आहे. त्यामुळे कोतकर याला जामीन देऊ नये असे म्हणणे न्यायालयात सादर करण्यात आले. दरम्यान, कोतकर याचा जामीन रद्द करावा अशी मागणी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात केलेली आहे.

You might also like
Comments
Loading...