अहमदनगर : केडगाव शिवसैनिक हत्याकांड प्रकरणी भानुदास कोतकरला पोलीस कोठडी

NAGAR MARDER

अहमदनगर/प्रशांत झावरे : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या अहमदनगर महापालिका निवडणूक निकालानंतर झालेल्या केडगाव येथील शिवसैनिक दुहेरी हत्याकांडानंतर लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप भोगत असलेल्या व प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी पॅरोलवर बाहेर असणाऱ्या भानुदास कोतकरला पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी द्यायला आले असताना पोलिसांनी अलगद सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने भानुदास कोतकरला १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अहमदनगर महापालिका पोटनिवडणुक निकालानंतर केडगावमध्ये दोन शिवसैनिकांच्या गोळ्या घालून व धारदार शस्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी हत्या करणाऱ्या व संशयित आरोपींना अटक केली आहे. तपास सुरू असताना केडगाव पोटनिवडणुकीत निवडून आलेला आरोपी नगरसेवक विशाल कोतकर याचे हत्याकांडापूर्वी पॅरोलवर तुरुंगाबाहेर असणाऱ्या भानुदास कोतकर व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्याशी संभाषण झाल्याचे आढळून आले होते. तसेच नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकर यानेच हे हत्याकांड घडवून आणले असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा समोर आला आहे. त्यामुळे यात भानुदास कोतकर व सुवर्णा कोतकर यांना ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे होते. व त्या दृष्टीने तपास करणेही अत्यंत गरजेचे होते.

भानुदास कोतकर हा लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेप झाल्याने अटक असताना पॅरोलवर उपचारासाठी बाहेर होता व त्याचवेळी हे हत्याकांड घडले व त्याचे पुतण्या विशाल कोतकर व सुनबाई माजी उपमहापौर सुवर्णा कोतकरबरोबर हत्याकांडा अगोदर फोनवर संभाषण झाले असल्याचे पोलिसांना आढळून आले, त्यामुळे संशयाची सुई भानुदास कोतकरच्या दिशेने वळली. दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार करण्यासाठी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर असल्याने न्यायालयाच्या आदेशाने जवळच्या पोलीस ठाण्यात म्हणजे पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास आलेल्या भानुदास कोतकरला पोलिसांनी अलगद सापळा लावून पकडले. पोलिसांना आता या हत्याकांडाअगोदर भानुदास कोतकर याने नगरसेवक विशाल कोतकर बरोबर काय संभाषण केले आहे याचबरोबर आणखी काही तपासादरम्यान माहिती मिळेल का याचा सखोल तपास करायचा असल्याने भानुदास कोतकर याला पोलीस कोठडी मिळाली आहे.