भंडारा – गोंदियात फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी करू नका – प्रफुल्ल पटेल

भंडारा – भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली होती . आज या मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र येथिल अनेक मतदार केंद्रांवर इव्हीएम बंद असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

दरम्यान तब्बल ४५० मतदान यंत्रे बंद असून, यामुळे विरोधकांनी या ठिकाणच्या मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. भंडारा – गोंदियात फेरमतदान होईपर्यंत मतमोजणी करू नका अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये बिघाड झाल्याने ही गंभीर बाब आहे. या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.दरम्यान ही मतदान यंत्रे निवडणूक आयोग आणि सरकारने जाणीवपूर्वक कारस्थान करीत बंद केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.