ट्रायबेकॉन आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात राष्ट्रीय परिषदेचा भंडारदरा येथे समारोप

blank

भंडारदरा : प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचा आज भंडारदरा येथे समारोप झाला.

केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव माननीय दीपक खांडेकर, राज्य आदिवासी विकास मंत्रालयाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा , दिल्ली येथील जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.चंद्रकांत लहारीया, आदिवासी विकास महामंडळाचे आयुक्त डॉक्टर नितिन पाटील, आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय एम जयराज उपस्थित होते.

आदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात मात्र प्रथमच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात व धोरण निश्चिती करता यावी या उद्देशाने ‘ट्रायबेकॉन’ ही राष्ट्रीय परिषद घेण्यात आली असं डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी सांगितले..

या तीन दिवसीय परिषदेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल तसेच पॉन्डीचेरी आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासह एकूण १५ राज्यांचे तीनशेहून प्रतिनिधी सहभागी झाले होते. २० तज्ज्ञ संशोधक व अभ्यासकांनी शोधनिबंध सादरीकरण केले.

आदिवासी संस्कृती व त्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचे प्रदर्शन, यासह सीड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या देशी बियाणांचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते. मवेशी येथील समूहाने भोवडा हे आदिवासी लोकनृत्य लोकसंगीत कार्यक्रम सादर केले. ठाकर महिलांनी त्यांचे पारंपरिक नृत्य सादर केले. मवेशी आश्रम शाळा संकुलातील विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयी चांगल्या सवयी, ॲनिमिया संदर्भात जनजागृतीपर नाटिका सादर केली.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सेलेन्स ची मान्यता मिळावी असे कार्य ही संस्था करत आहे अशा शब्दात केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव माननीय दीपक खांडेकर यांनी प्रशंसा केली. या तीन दिवसीय आदिवासी आरोग्य परिषदेत पद्मश्री डॉक्टर अभय बंग, पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन, आदिवासी विकास संचालनालयाचे आयुक्त नितीन पाटील, केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, राज्य आदिवासी विकास मंत्रालयाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

आदिवासी आरोग्यासंदर्भात फार कमी सामाजिक संस्था कार्य करतात, मात्र प्रवरा अभिमत विद्यापीठ लोणी यांनी तीन दिवसीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचे आयोजन केलं ही अतिशय प्रेरणादायी बाब असल्याचं आदिवासी विकास मंत्रालयाच्या सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या. आदिवासी समाजाला त्यांच्या आरोग्या संदर्भातल्या गरजाच माहीत नसल्यामुळे ते आरोग्य सुविधांची मागणीच करत नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केलं. प्रवरा मेडिकल ट्रस्ट आदिवासीबहूल क्षेत्रात देत असलेल्या आरोग्य सुविधांच्या प्रारूपा आधारे भंडारदरा जाहीरनामा यावेळी सादर करण्यात आला.

आदिवासी समाज मलेरिया, ॲनिमिया, संसर्गजन्य आजार, कुपोषण, अशिक्षितपणा, व्यसनाधीनता या समस्यांनी ग्रस्त आहे. यावर मार्ग काढायचा असेल तर आदिवासी समाजाकरीता संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांबाबत संशोधन व्हावे, पारंपरिक उपचार पद्धती वैद्य, वनऔषधी यांबाबत संशोधन, होणे गरजेचे आहे. या आणि अशा अनेक बाबी परिषदे अंती समोर आल्या. दंत शास्त्र विभाग, सामाजिक औषध शास्त्र विभाग व नर्सिंग विभागाने आदिवासी आरोग्या संदर्भात एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे भंडारदरा जाहीरनाम्यात सुचविण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या