fbpx

आज उन्हामुळे इव्हीएम बंद पडले, उद्या पावसामुळे बंद पडतील – अखिलेश यादव

नवी दिल्ली : काल महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया तसेच उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपूर विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र या पोटनिवडणुकांसाठी मतदान सुरु असताना अनेक ठिकाणी इव्हीएम मशिन्स बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. विरोधकांनी यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड होत आहे. पण कुठेही इव्हीएममुळे निवडणूक प्रभावित होणार नाही. आमच्याकडे योग्य प्रमाणात अतिरिक्त यंत्रे आहेत. यंत्रात बिघाड ही तांत्रिक अडचण आहे. उष्णतेमुळे व्हीव्हीपॅट खराब होतं असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एल वेंकटेश्वर लू यांनी सांगितले होते.

यावरून यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे. कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला आहे. आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. उद्या म्हणतील पावसामुळे आणि थंडीमुळे असे होत आहे. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवू इच्छितात. अशा शब्दात अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी फेरमतदानाची मागणी देखील यावेळी केली.