#भक्ती_शक्ती संगम – श्रीसमर्थस्थापित सातवा मारुती – शहापूरचे मारुतीराय

Samarth ramdas swami

ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी,(युवा कीर्तनकार, बीड, महाराष्ट्र) : कराड मसूर रस्त्यावर सुमारे नऊ दहा किलोमीटर अंतरावर शहापूरचा फाटा आहे. मारुतीचे मंदिर मुख्य रस्त्यापासून दोन फर्लांग तरी आत आहे. शहापूर गावाच्या एका टोकाला हे मंदिर आहे. येथील मारुतीची मूर्ती नेमकी कशाची बनविलेली आहे हे सांगता येत नाही पण ती चुन्याची बनविलेली आहे असे मानले जाते. मूर्तीची उंची सुमारे सहा फूट आहे. मारुतीच्या डोक्याला गोंड्याची टोपी आहे. देवळात तीन चौकटी आहेत.

देऊळ आणि मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मारुतीच्या पूजेची व्यवस्था शहापूरकर कुलकर्णी घराण्याकडे आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. ह्या देवळात एक ते सव्वा फुटाची एक पितळेची हनुमंताची मूर्ती आहे. चाफळ येथील रामनवमी उत्सवात ही मूर्ती चाफळला नेण्यात येते. पहिल्या दिवशीचा मान शहापूरकरांकडे असतो.

श्रीसमर्थांच्या अकरा मारुतींपैकी हा मारुती कालानुक्रमे पहिला गणला जातो. शके १५६६ ची ह्या मूर्तीची स्थापना आहे. त्यामागे खालीलप्रमाणे माहिती सांगितली जाते.

शहापूर गावात अंबाजीपंत कुलकर्णी हे गावकीची सर्व कामे पाहत. वृद्धापकाळी त्यांनी आपले जावई कमळाजीपंत शहापूरकर यांच्याकडे गावकीची सर्व व्यवस्था सोपवली. कमळाजीपंतांच्या पत्नीचे नाव सतीबाई शहापूरकर. शहापूरला श्रीसमर्थ आले असताना रामनामाचा उच्चार करीत, ॐ भवति भिक्षां देही म्हणत, शहापूरकरांच्या वाड्यात येऊन उभे ठाकले. दारासमोर रामनाम घेणे सतीबाईंना आवडले नाही. त्या म्हणाल्या, बुवा भरल्या घरात रामनाम घेऊ नका. श्रीसमर्थ म्हणाले, रामनामाने कल्याणच होईल. त्यावर सतीबाई म्हणाल्या, पण भिक्षा मिळणार नाही.

श्रीसमर्थ तिथून पुढे चालू लागले. श्रीसमर्थ दोन-तीन दिवस रोज येऊन भिक्षा मागायचे व सतीबाई रामनाम घेतले म्हणून त्यांच्यावर चिडायच्या आणि भिक्षा न घालताच त्यांना परत पाठवायच्या. काही दिवस बरे गेले व एकदिवस परत श्रीसमर्थ वाड्यासमोर आले तर त्यांना वाड्यात चिंताग्रस्त वातावरण दिसले. चौकशी करताच त्यांना कळाले की, कमळाजीपंतांना यवनाधिकारी पकडून घेऊन गेले आहेत. श्रीसमर्थ सतीबाईंना म्हणाले, चिंता करू नका, कमळाजीपंत निर्दोष सुटून परत येतील.

श्रीसमर्थांनी कचेरीत जाऊन सरकार दरबारी जो भरणा करावयाचा होता तो केला किंवा आपल्या दरबारी असलेल्या शिष्यामार्फत भरणा करून कमळाजीपंतांची सुटका केली व ते सुखरुप घरी परतले. सतीबाईंना नवरा सुटून आल्याचा आनंद झाला पण एका सत्पुरुषाची भिक्षेसाठी अवहेलना केली, याबद्दल चुटपुट लागून राहिली. काही दिवस गेल्यावर श्रीसमर्थ शहापूरकरांकडे भिक्षेला आले. यावेळी सतीबाई वाटच पाहत होत्या. त्यांनी श्रीसमर्थांच्या चरणी लोळण घेतली व श्रीसमर्थांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. नंतर पाकसिद्धी करून श्रीसमर्थांना भोजन घातले. सतीबाई आणि कमळाजीपंतांनी श्रीसमर्थांचा अनुग्रह घेतला.

पुढे सतीबाईंनी असा नेम केला की, श्रीसमर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय जेवण घ्यावयाचे नाही पण श्रीसमर्थांनी त्यांना असा नेम करण्यापासून परावृत्त केले व त्यांची निष्ठा पाहून त्यांच्या वाड्यात हनुमंताची भव्य मूर्ती स्थापन केली. आजदेखील शहापूरकर कुलकर्णी कुटुंबीयांकडे त्या मूर्तीची व्यवस्था आहे. या सतीबाईंना चार पाच मुले होती. त्यातील एका मुलाचे नाव भीम. हाच पुढे तंजावरकर भीमस्वामी म्हणून प्रख्यात झाला. तंजावर येथे राहून त्यांनी श्रीसमर्थ संप्रदाय वाढविला.

आजदेखील तंजावरात श्रीसमर्थ संप्रदायाचे चार-पाच रामदासी मठ सुस्थितीत आढळतात. वयाच्या ९९ व्या वर्षापर्यंत भीमस्वामींनी तंजावर येथे राहून श्रीसमर्थ संप्रदायाची सेवा केली. श्रीसमर्थांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, श्रीसमर्थांवरील भक्तीने, निष्ठेने कशा भरल्या जातात व आपले अवघे आयुष्य श्रीसमर्थ सेवेत, संप्रदायाच्या सेवेत वेचत असत, हे पाहिले की, आदराचे भरते येते आणि म्हणावेसे वाटते ‘तेथे कर माझे जुळती.!’ भीमस्वामी तर प्रत्यक्ष संपर्कात आलेले शिष्य पण आजच्या काळात देखील असे अनेक निष्ठावान समर्थभक्त आपल्याला पहावयास मिळतील.

फणीवर उठविला । वेग अद्भूत केला ॥ ह्या चरणाने सुरु होणारे हे जे काव्य आहे, त्यात एकदा श्रीसमर्थांना कफाची बाधा झाली होती तेव्हा या स्तोत्राच्या पठणाने त्यांची कफाची व्यथा कमी होऊन त्यांची काया सुदृढ झाली असे चरण आहे. प्रभुवर देवराया । जाहली वज्रकाया ॥ ही हकीकत शहापूरच्या मारुतीबद्दल सांगतात त्यामुळे हे स्तोत्र शहापूरच्या मारुतीला उद्देशून रचलेले आहे, ह्यात संशय नाही.

महत्वाच्या बातम्या:-