राहुल गांधी यांच्या पाठोपाठ भाई जगताप यांचेही खाते ट्विटरकडून निलंबित

bhai jagtap

मुंबई – दिल्लीतील नांगल येथील एका मुलीवर बलात्कार झाला होता. या पीडित कुटुंबियांची कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली होती. या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होत.

याच ट्वीटनंतर राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी काही नेत्यांच्या खात्यावर देखील ट्विटरने कारवाई केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या नेत्यांचेही ट्वीटर हँडल ट्वीटरकडून निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचेही ट्विटर खाते निलंबित करण्यात आले आहे. भाई जगताप यांनीही राहुल गांधी यांना आपला पाठींबा दर्शवला होता. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसच्या आणखी ५ वरिष्ठ नेत्यांचं ट्विटर अकाऊंट लॉक करण्यात आल्याचं समोर आलं आहे.महाराष्ट्रातील या नेत्यांशिवाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, काँग्रेसचे संपर्क विभाग प्रमुख रणदीप सुरजेवाला, लोकसभेतील पक्षाचे व्हीप माणिकम टागोर, आसाम प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांच्या अकाऊंटवर ट्विटरने कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान,यापूर्वी ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले होते की, राहुल गांधी यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी केलेल्या ट्विटमुळे कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन झाले आहे. त्यांनी बलात्कार पीडितेच्या पालकांसह छायाचित्र ट्विट केले होते. यामुळे त्यांचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या