‘हयात नसणाऱ्या नेत्याचा बदला म्हणून जर तुम्ही दंड थोपटणार असाल तर ते जनतेला रुचणार नाही’

bhagirath bhalake

पंढरपूर : काल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. २०१९ विधानसभा निकालानंतर उदयास आलेल्या महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना रंगणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष्य या निकालाकडे लागलं होतं. पंढरपुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा झेंडा फडकवला आहे.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दंड थोपटा अशी आमदार परिचारकांना साद घातली. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारकांनीही कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर उपस्थित कार्यकर्त्यांकडे पाहात दंड थोपटले. परिचारक यांच्या दंड थोपटण्याच्या या कृतीचा राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार भगीरथ भालके यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

दंड थोपटण्याची एवढीच हौस होती, तर निवडणुकीचे मैदान सोडून पळ का काढला, असा सवाल करत आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वतः लढा आणि मग थंड थोपटा, असे खुले आव्हान भगिरथ भालके यांनी प्रशांत परिचारकांना दिले आहे.

आमदार प्रशांत परिचारकांनी रविवारी शिवाजी चौकात दंड थोपटून बदला घेतल्याचे दाखवून दिले आहे. हयात नसणाऱ्या एखाद्या नेत्याचा बदला म्हणून जर तुम्ही दंड थोपटणार असाल तर लोकांना ते कदापीही रुचणारे नाही. विजय कोणाचा आणि दंड कोण थोपटतयं, अशी परिचारकांची खिल्लीही त्यांनी उडवली. एवढीच जर दंड थोपटण्याची हौस होती तर निवडणुकीच्या रिंगणात येऊन दंड थोपटले असते, तर लोकांनी स्वीकारले असते. आगामी 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात स्वतः या आणि मग दंड थोपटा. तुमचा दंड थोपटण्याचा क्षण बघण्याची जनतादेखील वाट बघतेय, असा सल्लावजा टोलाही भालकेंनी आमदार परिचारकांना लगावला.

महत्वाच्या बातम्या