भगवान बाबांच्या मूर्तीचे काम पूर्ण ; दसऱ्याच्या दिवशी होणार अनावरण

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले भगवानबाबा यांच्या २५ फूट भव्य मूर्तीचे त्यांच्या जन्मगावी सावरगाव (जि. बीड) येथे दसऱ्याच्या दिवशी अनावरण होणार आहे. भगवानबाबांच्या मुर्तीचे काम पूर्ण झाले असून उद्या या मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे.

भगवानबाबांची मूर्ती घडवण्याचे काम प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी बाबांवरील सर्व पुस्तके आधी वाचली. बाबांच्या सोबत राहिलेल्या व्यक्ती आणि परिचित यांना भेटून व्यक्तिमत्त्व समजून घेतले आणि अवघ्या महिनाभरात २५ फूट उंचीची मूर्ती घडवली, अशी माहिती शिल्पकार कांबळे यांनी दिली.

प्रमोद कांबळे याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले ‘बैसोनी पाण्यावरी, वाचली ज्ञानेश्वरी’ अशा फोटो ओळींनी सजलेली ही २५ फूट उंचीची मूर्ती नगर जिल्ह्यातील भाळवणी या गावामध्ये घडली आहे. या शिल्पावर कोणत्याही ऋतुचा परिणाम होणार नाही. ‘भगवानबाबांचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. साधारण सहा फूट उंची आणि कितीही गर्दी असली तरी लक्ष वेधले जाईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर ही मूर्ती घडवण्याच्या कामाला मी सुरुवात केली. उच्च दर्जाचे साहित्य वापरून या शिल्पाची निर्मिती झालेली आहे. ही मूर्ती घडवण्याचे भाग्य मला लाभले, हीच माझ्यासाठी फार आनंदाची आणि समाधानाची बाब आहे’, असेही ते म्हणाले.