पुणेकरांनो सावधान : खडकवासल्यातून आता ‘इतका’ विसर्ग सुरु

khadakwasla dam

पुणे : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, जळगावसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने कहर माजवला असून हाताशी आलेलं पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, पुण्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात चांगली वाढ झाली होती. यानंतर पावसाने काहीशी ओढ दिली होती.

आता पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला असून धरणांतील पाणीसाठा पुन्हा शंभर टक्क्यांपर्यंत गेला आहे. यामुळे धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच खडकवासल्यातून विसर्ग सुरु करण्यात आला होता. काल रात्री खडकवासला धरण साखळी परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने विसर्गात वाढ करण्यात येत होती.

आज सकाळी 11491 क्युसेक विसर्ग सुरु होता. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने आज दुपारी १२ वाजता या विसर्गात घट करण्यात आली आहे. धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 11491 क्युसेक विसर्ग कमी करून ठीक 12.00 वा. 9416 क्युसेक करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, असं खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नदीकाठावरील कुटुंबांनी सुरक्षित स्थळी जावं. तसेच, पुणे शहरात नदीपात्रात लावलेल्या गाड्या देखील इतरत्र पार्क कराव्यात असं आवाहन करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या