‘बेवडेही गर्लफ्रेंड घेऊन फिरतात, मला एकही पटेना!’, हतबल युवकाचं थेट आमदाराला पत्र

चंद्रपूर : मुली भाव देत नसल्याने एका हतबल तरुणाने थेट मतदारसंघातल्या आमदारालाच पत्र लिहिल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हे पत्र तुफान व्हायरल झाले आहे. आमदार साहेब, संपूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण मला एकही मुलगी पटत नसून, ही चिंतेची बाब आहे’ अशी खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

पत्राच्या शेवटी अर्जदार भूषण जांबुवंत राठोड असे लिहिलेले आहे. पत्र लिहिणारा तरुण खेड्यागावातून असून राजुरा- गडचांदूर या ठिकाणी दररोज जाणे- येणे करतो. परंतु, त्याला एकही मुलगी पटत नाही. असा मजकूर त्याने लिहिला आहे. सोबतच दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेंड असते. हे पाहून माझा जीव जळून राख होतो असे यात लिहिले आहे. पत्र लिहिणाऱ्याने आमदाराला मतदारसंघातील मुलींना आपल्याला भाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची अजब विनंती केली आहे.

पत्रात काय लिहिलेले आहे?
प्रति, आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा
विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत
अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज फेरी मारतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेंड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा.
आपला प्रेमी
भूषण जांबुवंत राठोड

दरम्यान, आमदार सुभाष धोटे यांनी अशा प्रकारचे कोणतेही पत्र आपल्याला मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हा युवक शोधण्यास सांगितले आहे. असे पत्र लिहिणे अयोग्य आहे. मात्र, तो सापडलाच तर त्याची समस्या विचारपूस करून दूर करता येईल असे आश्वासन आमदार धोटे यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :