fbpx

गांगुली-हरभजनने केली कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती 

kuldeep yadav

वेब टीम :ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम करणाऱ्या कुलदीप यादवचे सध्या सर्वत्र कौतुक सुरु आहे.फिरकीपटू हरभजन सिंह तसेच  माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही कुलदीपची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यामध्ये कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीचा सिंहाचा वाटा होता.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या २५३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १४८ अशी झाली होती.  कुलदीपने ३३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वेडचा त्रिफळा उडवला. यानंतरच्या चेंडूवर त्याने अॅश्टन अगरला शून्यावर पायचीत केले. षटकातील चौथ्या चेंडूवर पॅट कमिन्सला झेलबाद करत कुलदीपने हॅट्रिक घेतली. कुलदीप यादव भारताकडून हॅटट्रिक घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

sourav

येत्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाज असेल:सौरव गांगुली 

‘भारतीय संघ सध्याचा जगातील सर्वोत्तम संघ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने केवळ २५२ धावा केल्या. मात्र त्यानंतर भारताने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला केवळ २०२ धावांवर रोखले. भारतीय संघाची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे,‘कुलदीप येत्या काळात जगातील सर्वोत्तम गोलंदाज असेल,’ असे गांगुलीने म्हटले आहे.

Harbhajan Singh

हा क्षण जुन्या आठवणींना उजाळा देणारा: हरभजन सिंग 

 कुलदीपच्या कामगिरीनंतर ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणींना उजाळा देत हरभजन म्हणाला की, तोच प्रतिस्पर्धी, तेच मैदान आणि त्याच वयाचा गोलंदाज हा क्षण जुन्या आठवणींना उजाळा देणारा होता. कुलदीपची गोलंदाजी पाहून मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ मध्ये ईडन गार्डन्सवर खेळलेल्या कसोटीची आठवण झाली. कुलदीपची कामगिरी मोठे यश आहे. तो पुढे म्हणाला की, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात हॅटट्रिकचा पराक्रम करणे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठे यश असते. ही कामगिरी आगामी काळात आत्मविश्वास द्विगुणित करणारी ठरते. सध्याच्या घडीला कुलदीपची जागा घेणे कोणालाही शक्य नाही.