कामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार

टीम महाराष्ट्र देशा – बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी केलेला संप अखेर मागे घेतला आहे. यासोबतच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई देखील करण्यात येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कामगार संघटनांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बेस्टच्या कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. लाखो मुंबईकरांना या संपाचा फटका बसत असल्याने संप त्वरीत मागे घेण्यात यावा अशी मागणी करीत अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने संप तासाभरात मागे घ्यावा आणि संप मागे घेतल्याची घोषणा करा असा आदेश दिला होता.

दरम्यान,याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्थाची नेमणूक केली आहे. त्यानंतर बेस्ट कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. तसेच प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असून कामगारांच्या पगारात किमान 7 हजार रुपयांची वाढ होईल, असेही राव यांनी यावेळी सांगितले. कामगार जिंकला, कामगार एकजुटीचा विजय असो, या घोषणांनी वडाळा बस डेपोचा परिसर दणाणून गेला होता.