फायदेशीर महिला बचत खाते…

आर्थिक बाबतीत अजूनही महिला बर्‍याच अंशी घरातील पुरूषांवर अवलंबून असल्याचे चित्र पहायला मिळते. कित्येकदा नोकरी करणार्‍या महिलांनाही आर्थिक स्वातंत्र्य नसते. महिलांना आपला पैसा योग्य ठिकाणी सुरक्षितपणे ठेवावा, भविष्यासाठी राखून ठेवावा असे वाटत असते पण त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. खास अशाच महिलांसाठी बँकांनी महिला बचत खाते सुविधा सुरु केली आहे.
महिला बचत खात्याच्या रूपाने आता महिलांसाठी एक चांगली सुविधा विविध बँकांत उपलब्ध झाली आहे. तुम्ही महिला असाल तर प्रत्येक बँकेत तुम्ही महिला बचत खात्याची माहिती विचारून घ्यायलाच हवी. कारण सामान्य बचत खात्याच्या तुलनेत महिला बचत खाते अधिक फायदेशीर असते.
महिला बचत खाते विशेष करून महिलांसाठी तयार करण्यात आले आहे. या खात्यावर कॅशबॅक रिवॉर्ड तर असतेच पण त्याचबरोबर अन्यही अनेक आकर्षक ऑफर असतात, त्यातून महिलांच्या दैनंदिन गरजा भागू शकतात. आता अनेक खासगी बँकांनी खास महिला बचत खाती सुरू केली आहेत.
बचत खात्यावर ज्या महिलांना आधिकाधिक फायदे हवे असतात अशा महिलांसाठी हे खाते म्हणजे पर्वणीच म्हणावे लागेल. सामान्य बचत खात्यात ज्याप्रमाणे मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, तसा याही खात्यावर ठेवावा लागतो. महिला बचत खाते कोणतीही महिला व्यक्तीगतरित्या किंवा जॉइंट होल्डिंग असेल तर प्रायमरी होल्डर म्हणून उघडू शकते. या खात्यांमध्ये सर्व प्रकारच्या रिवॉर्डबरोबरच कस्टमाईज फीचर्सही पेश केले जातात आणि त्यात डेबिट कार्डही लिंक्ड असते.
महिला बचत खात्यांत अशा सेवा दिल्या जातात. ज्या सामान्य बचत खात्यात असत नाही. कोटक महिंद्रा बँकेने आपल्या सिल्क महिला बचत खात्यांतर्गत होम बँकींग सर्व्हिस उपलब्ध करून दिली आहे. त्यात खातेधारक कॅश पिकअप, कॅश डिलिव्हरी, चेक/ड्राफ्ट डिलीव्हरी वगैरे सेवा घेऊ शकते. अर्थात ही सेवा निवडक शहरांपुरतीच आहे. काही बँका महिला बचत खात्याला अपघात विमाही देतात. त्यामुळेही हे खाते नक्कीच फायदेशीर आहे.