‘गरीब असलो म्हणजे आम्ही घाणीत राहायचे का?’, कोविड सेंटरमधील वृद्धेची व्यथा

उस्मानाबाद : सकाळी नाश्ता थोडा येतो. आम्ही जेथे राहतो त्या ठिकाणच्या स्वच्छतागृहाची स्वच्छता नाही. मग आम्ही राहायचे कसे? आम्ही गरीब असलो म्हणजे काय झाले, आम्ही घाणीत राहायचे का? आम्हाला तुम्ही सेवा दिली पाहिजे, अशी भावनिक व्यथा कळंबच्या शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड केअर सेंटरमधील एका वृद्ध महिलेने आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्यासमोर मांडली.

कोरोना झाल्यावर पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येत आहे. पण तिथे रुग्णांची काळजी घेतली जाते की नाही? हे पाहण्यासाठी शिवसेनेचे आ.कैलास घाडगे-पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. त्यांनी तेथील रुग्णांशी तसेच त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या.

उपजिल्हा रुग्णालय तसेच शासकीय तंत्रनिकेतन येथील कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेऊन स्वच्छता व जेवणाच्या बाबतीत असलेल्या अडचणीमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, तहसीलदार रोहन शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी जीवन वायदंडे इत्यादी उपस्थित होते.