सत्ताधारी पक्षात असल्याने आम्ही संयम ठेवतोय, त्यांनी अंत पाहू नये; अब्दुल सत्तारांचा इशारा

Abdul Sattar

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात येत आहेत. त्यांना विविध पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या सर्वांनी लोकशाहीच्या विरोधात जाण्याचा विचार करु नये. आम्ही सत्तेत असल्याने संयम ठेवतो आहोत. मात्र, आमच्या संयमाचा अंत पाहू नका. नसता परिणाम चांगले होणार नाहीत, असा खरमरीत इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुक्तीसंग्राम दिनाचे मुख्य ध्वजारोहण होणार आहे. त्या नंतर शहरासाठी विविध योजनांची पाहणी आणि आढावा ते घेणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. या दरम्यान एमआयएमच्या वतीने तुतारी वाजवून त्यांचे उपहासात्मक स्वागत करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, धनगर समाज आणि मराठा संघटनांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. या सर्व पक्ष आणि संघटनांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खरमरीत इशारा दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, मराठवाड्याच्या विकासाच्या आड विरोधी पक्षातील नेते मंडळी येत असल्याचा आरोपही सत्तार यांनी केला. इतकेच नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या विरोधकांना जनता धडा शिकवणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या