बीजिंग महापालिका तर आमच्या हातात नाही, तिथेही पूर आलाय – मुख्यमंत्री ठाकरे

uddhav thackeray

मुंबई : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तर, दरडी कोसळून देखील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण, रायगड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करत योग्य मदत करण्यासह दुरोगामी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केलं असून विरोधकांनी मात्र ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईत देखील दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड हाल सोसावे लागले असून शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेचा दावा पुन्हा खोटा ठरल्याने भाजपने अधिक आक्रमक टीका केली होती.

आता विरोधकांच्या टीकेला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुंबईवर नैसर्गिक आपत्ती यायच्या त्या येतच आहेत. सध्या एक नवीन संकट आहे. काही दिवसांचा, काही महिन्यांचा पाऊस काही तासांत पडतोय. पूरस्थिती मुंबईतच नाही, जगभर निर्माण होतेय. तिथे तर महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. बीजिंग किंवा जिथे कुठे जगभरात पूर आले, त्या महापालिका काही आमच्या ताब्यात नाहीयेत. पण तिथेही पूर आले. आता त्याला जबाबदार कोण? हे तिथे कोण असतील ते बोलत असतील,’ असा टोला ठाकरेंनी लगावला आहे.

मुंबईतील एच पश्चिम विभागामधील वॉर्ड ऑफिसच्या इमारतीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पालिका अधिकाऱ्यांचा आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. यावेळी त्यांनी भाषणात पुरस्थितीबाबत भाष्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या