fbpx

चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थित ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन घेतले मागे

टीम महाराष्ट्र देशा – चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने केलेल्या पोलीस आयुक्तांवरील कारवाईविरोधात ममता गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलनावर बसल्या होत्या. त्यांनी त्यांचे धरणे आंदोलन मागे घेतले आहे. याच ठिकाणी त्यांनी मंत्रीमंडळाची बैठक घेतली होती आणि फाईलवर सह्याही केल्या होत्या. अखेर न्यायालयाच निर्णय हा आपला विजय असल्याचे म्हणत मंगळवारी सायंकाळी त्यांनी धरणे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे.

आंदोलन मागे घेण्याची घोषणा करत असताना ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, ‘हे धरणे आंदोलन राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे आपण धरणे आंदोलन थांबवत आहोत. न्यायालयाने आज सकारात्मक निर्णय दिला. पुढील आठवड्यात दिल्लीत हा मुद्दा आम्ही पुन्हा उपस्थित करु’. मिळालेल्या माहितीनुसार, 13, 14 फेबुवारीला दिल्लीत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे.

पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआयमधील वादावर सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले असतानाच पश्चिम बंगाल सरकारने राजीव कुमारांवर शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना हे पत्रक पाठवले आहे.

चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणल्याचे नाट्य रविवारी घडले. केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील या राजकीय युद्धाच्या भडक्याने देशभरात खळबळ उडाली. मध्य कोलकात्यातील लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाट्याचे स्वरूप ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असेच होते. यावेळी पश्चिम बंगाल पोलीस आणि सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमकींच्याही अनेक फैरी झडल्याचे सूत्रांनी सांगितले. हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहोचला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना अटकेपासूनही संरक्षण दिले होते.