‘आधी माध्यमांवर पाळत ठेवली, आता छापेमारी.. हे कुठंवर चालणार?’ राष्ट्रवादीचा मोदींना सवाल

मुंबई : देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक असलेल्या दैनिक भास्कर माध्यम समूहाच्या विविध कार्यालयांवर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर आयकर विभागाच्या पथकांनी कारवाई केली. या कार्यालयांची झाडाझडती सुरू आहे.

या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी झाल्याचे उघड झाल्यानंतर केंद्र सरकार संबधित माध्यमांना लक्ष्य करत आहे. याचा ताजा बळी दैनिक भास्कर ठरलं आहे. माध्यमांनी उत्तर प्रदेश आणि योगी आदित्यनाथ सरकारचे अपयश समोर आणले. त्यामुळे त्यांचा आवाज दाबून सत्य लपवले जात आहे’ असे मलिक म्हणालेत.

त्याचबरोबर मलिक यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारलेत. ‘ही अघोषित आणीबाणी नाही का? ही माध्यम स्वातंत्र्याची हत्या नाही का? हे लोकशाहीचं मृ्त्यू वॉरंट नाही का? भारताला आणि भारतीयांना उत्तर हवे आहे. अगोदर माध्यमांतील लोकांवर पाळत ठेवली. आता माध्यमांवर छापेमारी.. हे कधीपर्यंत चालणार आहे? गोपनीयतेच्या अधिकाराचं केंद्र सरकारचं उल्लंघन करत आहे’ अशी मोदी सरकारवर केली आहे.

दरम्यान, दैनिक भास्कर समुहावर कर चोरी प्रकरणात आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतू अर्थ मंत्रालयाचाच महत्त्वाचा भाग असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, भास्कर समूहाच्या कार्यालयांवर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनूसार, दैनिक भास्करच्या ज्येष्ठ संपादकाने सांगितले की, जयपूर, अहमदाबाद, भोपाळ आणि इंदौर कार्यालयात या ग्रुपच्या छापे टाकण्यात आले. उत्तर प्रदेश टेलिव्हिजन चॅनल, भारत संवाद यांच्यावरही छापेमारी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकरच्या पथकाने कर दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी लखनऊ कार्यालय आणि संपादकाच्या घराची झडती घेतली.

महत्वाच्या बातम्या

IMP