fbpx

निकालापुर्वीच विरोधकांची सत्तास्थापनेची तयारी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेच्या शेवटच्या टप्यातील मतदान रविवारी होणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी प्रचारच्या तोफा थंडावल्या आहेत. आता सगळ्यांचे लक्ष शेवटच्या टप्यातील मतदानाकडे लागले आहे. तर दुसरीकडे भाजप विरोधी पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरु केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी २३ मे च्या निकालानंतरची रणनीती आखण्यासाठी पक्षनिहाय भेटी घेण्याचा धडाका लावला आहे.

या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असे विरोधकांनी गृहीत धरले आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट होण्याचे अस्त्र अवलंबले आहे. त्यासठी चंद्राबाबू नायडू आणि के. चंद्रशेखर राव विविध पक्षनेत्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत.

आता पर्यंत चंद्राबाबू नायडू आणि के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. तर शनिवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार असून लखनऊला जाऊन मायावती आणि अखिलेश यादव यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. तसेच डाव्या पक्षांना देखील आपल्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत आहे. त्यामुळे निकालापूर्वीच विरोधीपक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग बांधला आहे.