बीडचा ‘माफिया राज’ संपुष्टात आणावा; पंकजा मुंडे राज्यपालांच्या भेटीला

बीड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून नुकतेच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता घणाघात केला होता. बीडमध्ये अनेक अवैध धंदे वाढत आहेत. खून, दरोडे आणि महिला अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. तरी देखील जिल्ह्यातील गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, असा आरोप पंकजा यांनी केला. बीड जिल्ह्यातील बोकाळलेला माफिया राज बंद करावा, पण या माफिया राजला सत्तेत बसलेल्या लोकांचा पाठिंबा असल्याची टीका देखील त्यांनी केली होती.

यानंतर आता बीडसह मराठवाडयातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना विमा मिळावा आणि बीड जिल्हयातील ‘माफिया राज’ संपुष्टात आणावा या मागणीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने बीडसह मराठवाडयातील सर्वच जिल्हयातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. अतिवृष्टीत अनेक ठिकाणी पशूधन वाहून गेली तर अनेकांना यात आपला प्राण गमवावा लागला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण काळात शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची गरज असल्याने त्यांना तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा अशी मागणी यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यपालांकडे केली.

बीड जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनात मोठी वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. कायद्याचा कसलाही धाक गुन्हेगारांना राहिला नाही. माफियांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे, हा माफिया राज बंद करावा असेही पंकजाताई मुंडे यावेळी म्हटले. राज्यपाल कोश्यारी यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या