झेडपीच्या सहा पैकी पाच सदस्यांची अपात्रता कायम, पंकजा मुंडे यांचा निर्णय

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विजयी होऊन जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत भाजपला थेट मतदान करणाऱ्या आणि व्हीप डावलून गैरहजर राहील्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविलेल्या सहा पैकी पाच जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेचा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कायम ठेवला.

पंकजा मुंडे यांच्या निर्णयामुळे आश्विनी निंबाळकर यांना दिलासा भेटला असून आमदार सुरेश धस समर्थक प्रकाश कवठेकर, शिवाजी पवार, अश्विनी जरांगे, संगीता महारणोर व मंत्री जयदत्त क्षीरसागर समर्थक मंगल डोईफोडे यांची अपात्रता कायम राहीली.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य विजयी झाले. मात्र अध्यक्ष – उपाध्यक्ष निवडीवेळी त्यावेळी राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्या पाच समर्थकांनी थेट भाजपला मतदान केले. तर, क्षीरसागर समर्थक गैरहजर राहीले होते. भाजपने शिवसेना, शिवसंग्राम आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या या बंडखोर सदस्यांच्या मदतीने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळालवी.

जिल्हा परिषदेतील गटनेते बजरंग सोनवणे, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगला सोळंके व अजय मुंडे यांच्या यांच्या याचिकेवरून तत्कालिन जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये प्रकाश कवठेकर , शिवाजी पवार , आश्विनी जरांगे ,संगीता महारणोर , मंगल डोईफोडे आणि आश्विनी निंबाळकर या ६ सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवले. या निर्णयाला वरील सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे आव्हान दिले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अपात्रतेच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली. मात्र, या सहा सदस्यांचा मतदानाचा अधिकार गोठविला होता. या याचिकेवर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी निर्णय दिला.

यातील अश्विनी निंबाळकर वगळता इतर पाच सदस्यांचे अपील ग्रामविकास मंत्र्यांनी फेटाळले असून अश्विनी निंबाळकर यांना त्या अपक्ष निवडून आल्याने पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होत नाही असे सांगत दिलासा दिला आहे. यामुळे आता प्रकाश कवठेकर , शिवाजी पवार , आश्विनी जरांगे ,संगीता महारणोर , मंगल डोईफोडे यांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.

महत्वाच्या बातम्या