आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील स्थानिक राजकारण चव्हाट्यावर आले आहे. गरीब नागरिकांच्या अन्न वाटपावरून हा वाद पुढे आला आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक गोष्टीवरून हमरी-तुमरी सुरू आहे. एकमेकांच्या तक्रारी करत उणेदुणे काढले जात आहे. असं असताना चक्क शिवसेनेच्या कार्यकर्त्याचे शिवभोजन थाळी केंद्र बंद केल्याने त्याने राष्ट्रवादीच्या आमदाराला पत्र लिहित गरिबांच्या अन्नात माती कालवू नका, अशी विनंती केली आहे. याबाबतचे वृत्त news18 लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, अशी हात जोडून विनंती शिवसेना बीड जिल्हाप्रमुखांनी केली असल्याचं सांगण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून 150 गरजूंना मोफत जेवण दिले जात होते, मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी तक्रार केल्यामुळे कुठली ही शहानिशा न करता प्रशासनाने 4 एप्रिला स्थगितीचा आदेश दिला. त्यामुळे झोपडपट्टीवरील गरजू 150 कुटुंबातील लोकांना जेवण मिळाले नाही.

त्यानंतर संतापलेल्या जिल्हा प्रमुखाने ‘आमदारसाहेब एवढया खालच्या पातळीचे राजकारण करू नका. गरीब लोकांच्या तोंडाचा घास काढू नका. आम्ही आमच्या पध्दतीने काम करतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हात जोडतो खुनशी राजकरण थांबवा’ अशी विनंती केल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने आली आहे.