बीड; बनावट मद्य कारखान्यावर छापा, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

बीड: मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या बनावट मद्य बनवण्याच्या व्यापाराला अखेर चपकार बसला आहे. तालुक्यातील नागापूर जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सायंकाळी एका बनावट दारुच्या कारखान्यावर छापा टाकला. या ठिकाणाहून तब्बल २६०० लिटर स्पिरीट आणि इतर यंत्र सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागापूर जवळील एका इमारतीत सुरु असलेल्या बनावट दारुच्या कारखान्यावर छापा मारला. त्या ठिकाणी बनावट दारुची वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये बॉटलिंग होत होती. पथकाला त्या ठिकाणी वेगवेगळे लेबलही मिळाले आहेत. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट दारु निर्मिती सुरु असेल याची पथकालाही कल्पना नव्हती त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.

घटनास्थळावरील साहित्याचे प्रमाण कळल्यानंतर स्वत: अधीक्षक नितीन धार्मिक घटनास्थळी गेले. या ठिकाणाहून पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले आहे तर २६०० लिटर स्पिरीट, बॉटलिंगची मशिन, वेगवेगळ्या कंपन्यांचे लेबल आणि इतरही साहित्य जप्त केले आहे. पिंपळनेर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

महत्वाच्या बातम्या