स्वत:ला बीडच्या गृहमंत्री म्हणणाऱ्या पंकजा मुंडे आता कुठे आहेत – चित्रा वाघ

टीम महाराष्ट्र देशा : स्वत:ला बीडच्या गृहमंत्री म्हणणाऱ्या पंकजा मुंडे कुठे आहेत, असा अप्रत्यक्ष सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विचारला आहे. बीडमध्ये बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन, भावाने बहिणीच्या नवऱ्याला तिच्या डोळ्यांदेखत भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत संपवलं. बीड जिल्ह्यातील गांधी नगरातील या घटनेमुळे राज्यभरात थरकाप उडाला आहे. नवऱ्यावर भररस्त्यात वार झाले असताना, पीडित पत्नी मदतीसाठी याचना करत होती, मात्र तिला मदत मिळाली नाही.

या सर्व प्रकारानंतर चित्रा वाघ यांनी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. चित्रा वाघ यांनी ट्विट करुन पंकजा ताईंच्या बीडमध्ये गुंडाराज असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपण बीडपुरत्या गृहमंत्री आहोत असं म्हटलं होतं. त्यावरुन चित्रा वाघ यांनी पंकजांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे ?

मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता मी बीडपुरती का होईना मी गृहमंत्री आहे, असं म्हटलं होतं. परळी येथील गोपीनाथ गडावरील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गोपीनाथ मुंडेंनी मुंबई आणि राज्यातील गँगवॉर नष्ट केलं होतं. बीडमध्येही आपण तसंच केल्याचं पंकजा मुंडे त्यावेळी म्हणाल्या होत्या.