fbpx

बीड लोकसभा : राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे यांच्या उमेदवारीमुळे अमरसिंह पंडितांना धक्का

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने अनेक नवीन नेत्यांना संधी दिली आहे. या यादीत राष्ट्रवादीने शिरूर मधून विलास लांडे यांना डावलून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे तर, दुसरीकडे म्हणजेच बीडमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडित यांना वगळून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बीड लोकसभा मतदार संघातून आमदार अमरसिंह पंडित हे यंदाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानले जात होते. दुसरी यादी जाहीर होण्याच्या क्षणापर्यंत अमरसिंह पंडित यांचे नाव निश्चीत मानले जात होते. परंतु दुसऱ्या यादीत पंडीत यांचे नाव डावलून बजरंग सोनावणे याचं नाव जाहीर करण्यात आलं. बजरंग सोनावणे हे भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरुद्ध लढणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित सारख्या बड्या नेत्याला मागे ठेवून बजरंग सोनावणे यांना बळीचा बकरा म्हणून पुढे केले आहे की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.

बजरंग सोनावणे हे येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष आहेत. बजरंग सोनावणे याचं नाव जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे सोनावणे याचं नाव राष्ट्रवादीने संभाव्य उमेदवारांच्या यादीत घेतले. त्यानंतर स्थानिक नेत्यांकडून देखील बजरंग सोनावणे यांच्या कडे पक्षाने बीड मतदार संघाचे नेतृत्व सोपवावे अशी मागणी केली होती. दरम्यान, बजरंग सोनावणे यांनी मधल्या काळात निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून चांगलाच जन संपर्क वाढवला होता.

दरम्यान, अमर सिंह पंडित यांची विधान परिषदेची मुदत संपत आहे. मात्र लोकसभेला उमेदवारी देवून राष्ट्रवादी कडून अमरसिंह पंडित यांचे पुनर्वसन करणार असल्याची माहिती मिळत होती. परंतु बजरंग सोनावणे यांच्या उमेदवारी मागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय खेळी असल्याचे बोले जात आहे.