fbpx

बीड लोकसभा : कोणता पक्ष, कोणता उमेदवार?

टीम महाराष्ट्र देशा :(प्रवीण डोके) बीड लोकसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ साली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे विजयी झाले होते . तर, त्यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रितम मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या . येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी भाजप आणि विशेषत: पंकजा मुंडे हे जोरदार करत असल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे.  दुसऱ्या बाजूला  राष्ट्रवादी- कॉंग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटत नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यामध्ये आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटला असून अनेक उमेदवार निश्चित करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस कामाला लागले आहे. मात्र भाजप–शिवसेना युतीवर अद्याप कोणतीच हालचाल होताना दिसत नाही. राष्ट्रवादीच उमेदवार कोण?, शिवसंग्राम पक्ष काय भूमिका घेणार?, युती झाली नाही तर शिवसेना कोणता उमेदवार देणार याबाबत घेतलेला हा आढावा.

भाजप
उमेदवार : विद्यमान खा. प्रीतम मुंडे
परिस्थिती : केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला असून बीडच्या विद्यमान खा. प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे दौऱ्यावर आले होते . त्यावेळी त्यांनी खा. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे यांचे अचानक निधन झाले होते. त्यांची मुलगी प्रीतम मुंडे या लोकसभा मतदारसंघातून उभा राहिल्या. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची सहानभूती आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी या मतदारसंघात फार मोठे काम उभा केलेले आहे. यामुळे प्रीतम मुंडे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

मात्र या मतदारसंघात येणाऱ्या लोकसभेला परिस्तिथी वेगळी आहे. गेल्या साडेचार वर्षात  या मतदार संघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कामगिरीमुळे त्यांना माणनारा वर्ग जिल्ह्यात वाढला आहे. बीड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे वाढलेले वर्चस्व आणि परळी नगर पालिका राष्ट्रवादीकडे गेल्याने यावेळी चित्र वेगळे पाहवयास मिळणार हे मात्र नक्की. त्यामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्यासाठी हा विषय चिंतेचा आहे. त्यावर मार्ग काढून निवडणुकीत काय चमत्कार घडवणार हे आगामी काळातच समजणार आहे.

राष्ट्रवादी
उमेदवार : विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित, विधानसभा आमदार जयदत्त क्षीरसागर,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
परिस्थिती : या लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाचा उमेदवारीचा तिढा काही सुटता सुटेना. उमेदवार कोण असणार हे अद्याप ही समजू शकलेले नाही. या मतदार संघात विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्या तोडीस तोड उमेदावार द्यायचा म्हणाल्यास तसाच तगडा उमेदवार हवा आहे. त्यामुळे बीड लोकसभेला राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला मिळणार हा प्रश्न अजूनही अनुउत्तरीतच आहे.

परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कामगिरीमुळे त्यांना माणनारा वर्ग जिल्ह्यात वाढला आहे . पक्षाच्या मूळ मतदारांसह ते त्यांच्या समाजाची काही मते घेऊ शकतील असे अंदाज वरिष्ठ पातळीवरून बांधले जात आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांना सुद्धा पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या मतदार संघात पाहवयास मिळत आहे.

त्यासोबतच जयदत्त क्षीरसागर यांचे जिल्हाभर असलेले कार्यकर्त्यांचे जाळे कायम आहे. तेही लोकसभेला इच्छुक असल्याचे कळते आहे. आमदार अमरसिंह पंडित यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने ते लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते आहे.

राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित यांच्या नावावर सहमती दर्शवली असल्याचे माहिती मिळाली आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे विरुद्ध अमरसिंह पंडित असा सामाना रंगण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, बीडमध्ये मुंडे विरुद्ध पंडित अशीच लढत होईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

शिवसंग्राम पक्ष
उमेदवार : अद्याप नाव चर्चेत नाही
परिस्थिती : काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे संस्थापक व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी स्थानिक भाजप नेतृत्व कायम राष्ट्रवादीला मदत करत असून शिवसंग्रामला अपमानाची वागणूक देत असल्याचे कारण देत जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठिंबा काढून घेतला आहे. आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुका लढविणार असून युतीचे अधिकार प्रदेशाध्यक्षांना देण्यात आल्याचेही मेटे यांनी यावेळी सांगितले होते. त्यामुळे शिवसंग्राम भविष्यात काय भूमिका घेणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

शिवसेना
उमेदवार : अद्याप नाव चर्चेत नाही
परिस्थिती : बीडचा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे होता तसेच जिल्ह्यातील सहा पैकी एकमेव बीडची जागा शिवसेनेला दिली जात होती. गेल्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे लागलेल्या लोकसभा पोटनिवडणुकित खासदार प्रीतम व परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. मात्र, यंदा जिल्ह्यातील सहा विधानसभा आणि लोकसभेची तयारी पूर्ण क्षमतेने शिवसेनेने केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युती झाली नाही तर उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

काय होऊ शकते?
विद्यमान खा. प्रीतम मुंडे आणि विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित अशीच लढत होईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

विधानसभा मतदार संघ आणि बलाबाल
या मतदार संघात माजलगाव, बीड, गेवराई , आष्टी, केज आणि परळी विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पाच भाजप आणि एक राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत.