शेतकऱ्यांसाठी खुशखबर : बीड जिल्ह्याला ३०० कोटींचा विमा , सोयाबीन वगळता सर्वच पिकांना विमा कवच

बीड / अविशांत कुमकर : ऐन दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्याना विमा कंपनीच्या निर्णयामुळे चांगला फायदा होणार असून खरीपाच्या तोंडावर इन्श्यूरन्स कंपनीने बीड जिल्ह्याला ३०० कोटी रुपयांचा विमा मंजूर केला असून सोयाबीन हे पीक वगळता जवळपास कापूस पिकासह सर्वच पिकांना या विम्याचा फायदा होणार आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास ७ लाख ४२ हजार ९१५ शेतकरी विमा घेण्यास पात्र ठरले आहेत.

खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये विमा भरलेल्या शेतकऱ्यासाठी इंडियन इन्श्यूरन्स कंपनीने नुकताच बीड जिल्ह्यासाठी ३०० कोटींचा विमा मंजूर केला आहे. यामध्ये उडीद, मूग, कडधान्य आणि कापूस या पिकांचा समावेश आहे. कापूस या पिकाला सर्वात जास्त हेक्टरी २५ ते ३० हजार इतका विमा मंजूर करण्यात आला आहे. या विमा रकमेची मंजूरीही जिल्ह्यातील सर्कलवाईज वेगवेगळी आहे. जवळपास काही मोजके सर्कल वगळले तर सर्वच कृषी विभागांच्या सर्कलनुसार ही विमा मंजूरीची रक्कम शेतकऱ्या च्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यानी बँक खात्यांना आधार लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यानी तात्काळ आपले बँक खाते आधारलिंक करून घ्यावयाचे आहे. सोयाबीन या पिकालाही विमा कवच मिळणार असून त्यासाठी मात्र पंधरा दिवसांची प्रतिक्षा शेतकऱ्याना करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्याच्या खात्यावर विमा रक्कम जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यानी विमा भरल्याची पावती, आधार कार्ड आणि बँक खाते पासबुक हे  सर्व कागदपत्रे घेऊन तालुक्यातील कृषि विभागातील इंडियन इन्श्यूरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांंना भेटावयाचे आहे.

इंडियन इन्श्यूरन्स कंपनीने बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील कृषि विभागात शेतकऱ्यांंच्या विम्याच्या शंका दूर करण्यासाठी इन्श्यूरन्स कंपनीचे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये विमा रक्कम जमा होत असल्याने दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्याना याचा मोठा फायदा मिळणार आहे. सोयाबीन या पिकाला पंधरा दिवसानंतर विमा रक्कम मिळाल्यानंतर जवळपास ११ लाख शेतकऱ्याना या विमा कवचाचा फायदा होणार असल्याचेही इंडियन इन्श्यूरन्स कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी सांगितले आहे.