नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीमुळे देशातील लोकशाही धोक्यात- अशोक चव्हाण

ashok chawan and narendra modi

 

Loading...

बेळगाव – भाजपकडे कर्नाटकच्या विकासासाठी कोणतेही ठोस धोरण नाही. भाजपला सत्ता दिल्यास कर्नाटकचा नाही फक्त रेड्डी बंधूंचा विकास होणार आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सरकार बहुमताने निवडून द्या असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक खा. अशोक चव्हाण यांनी केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण कर्नाटकच्या प्रचार दौ-यावर आहेत. त्यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर,खानापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या. या जाहीर सभांना हजारो संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी खा. चव्हाण यांचे छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन जोरदार स्वागत केले.

जाहीर सभेला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, शेतक-यांच्या मालाला हमीभाव देऊ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू तसेच दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकरी देऊ अशी आश्वासने दिली होती मात्र सत्तेत येऊन चार वर्ष झाली यातले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ९५ टक्के आश्वासने सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे नेते कर्नाटकात येऊन भाजपला सत्ता द्या, महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकचा विकास करू असे सांगत आहेत पण भाजपने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतक-यांची मुले आणि सुशिक्षित बेरोजगार तरूणही आत्महत्या करित आहेत. कर्नाटकात महाराष्ट्रासारख्या शेतकरी आत्महत्या होऊ द्यायच्या नसतील तर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे सरकार कर्नाटकात बहुमताने निवडून द्या हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे खा. चव्हाण म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. ही लढाई लोकशाही विरूध्द हुकुमशाहीची लढाई आहे. भाजपला पराभूत करून लोकशाहीचे रक्षण करण्याची क्षमता फक्त काँग्रेस पक्षाकडेच आहे. जेडीएस आणि इतर पक्षांकडे नाही. जेडीएस ही भाजपची बी टीम असून जेडीएसला दिलेले मत म्हणजे भाजपला मत आहे. सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिली, कोणीही उपाशीपोटी राहू नये म्हणून गरिबांना अल्पदरात भोजन देणारी इंदिरा कँटीन योजना सुरु केली, गरिब, दलित,अल्पसंख्यांक समाजासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक वेगाने प्रगती करित असून कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी. के शिवकुमार,अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा खा. सुष्मिता देव, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पी. व्ही. मोहन, बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय नवलगट्टी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामकिशन ओझा, सचिव प्रकाश सातपुते,तौफिक मुलाणी इ. उपस्थित होते.Loading…


Loading…

Loading...