राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, दुष्काळजन्य परिस्थितीची दिली माहिती

स्वप्नील भालेराव /पारनेर- महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्यातली त्यात काही तालुक्याची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यामध्ये पारनेरचाही समावेश आहे. शुक्रवारी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत जावून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीची माहिती पवार यांना दिली.

पारनेर तालुक्यातील काही भागात सिंचनाच्या सुविधा नसल्याने तिथे सातत्याने दुष्काळजन्य परिस्थिती असते. विशेष करून पठार भागात पावसाचे प्रमाण सुध्दा दरवर्षी कमी असते. गेल्या वर्षी संपुर्ण पावसाळा कोरडा गेल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. बऱ्याच गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याकरीता पायापीट करावी लागत असल्याची स्थिती आहे. जनावरांना चारा पाणी देयचा कसा असा यक्ष प्रश्न पारनेरच्या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. जनावरांच्या छावणी अध्याप सुरू झाल्या नसल्याने तालुका चिंतेत आहे. या संदर्भात निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर आंदोलन करून शासकिय यंत्रणाना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

बाहेर जनावरे बांधून शासनाचे लक्ष्य वेधले होते. येत्या सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या सर्व परिस्थितीची माहिती देण्याकरीता निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी पारनेर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीत जावून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी तालुक्यातील दुष्काळाच्या स्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना दुष्काळशी सामना करण्याच्या दृष्टीकोनातून सुचना दिल्या. शेतकऱ्याच्या हिताकरीता संघर्ष करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळ निवारणार्थ होत असलेल्या दिरंगाई विरोधात राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा विषय शरद पवार यांच्या कानावर उपस्थितांना घातला.यावेळी जेष्ठ नेते अशोक सावंत,सुदामराव पवार ,दीपक पवार, बाबाजी तरटे ,जयसिंग मापारी,विक्रमसिंह कळमकर,अशोकराव घुले,अरुण पवार,ठकाराम लंके,किशोर थोरात, नामाशेठ पवार उपस्थितीत होते.