CAAमुळे मुस्लिमांना कोणताही धोका नाही – रजनीकांत

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी सीएएच्या मुद्द्यावरुन होणाऱा विरोध पाहता यावर दु:ख व्यक्त केलं होतं. ट्विट करत त्यांनी या सर्व प्रकरणी निराशा व्यक्त केली होती. हिंसेच्या मार्गाने कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही. मी भारतीयांना कायम एकत्र राहण्याचाच संदेश देत आलो आहे. कायम देशाची सुरक्षितता आणि देशहिताचा विचार करा. असं त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

आता पुन्हा एकदा आपल्या रोकठोक मताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. CAA कायद्यामुळे देशातील मुस्लिमांना याविषयी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याची ठाम भूमिका रजनीकांत यांनी मांडली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA हा आपल्या देशातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव पाडत नाही. मुळात मुस्लिमांवर याचे काही परिणाम होणार असतील, तर त्यांच्यासोबत उभा असणारा मी पहिला व्यक्ती असेन.

एनपीआर हा देशासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचं म्हणत त्यामुळे देशाबाहेरील नागरिक कोण आहेत, याची माहिती मिळेल असं ते म्हणाले. शिवाय अद्यापही एनआरसी लागू झालेला नाही, असंही ते म्हणाले. देशाच्या फाळणीनंतर ज्या मुस्लिमांनी भारतात राहण्यालाच पसंती दिली होती. त्यांना देश सोडून कसे काय पाठवले जाईल, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

काही राजकीय पक्षांकडून वैयक्तिक स्वार्थासाठी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लोकांच्या भावना भडकाविण्याचे काम केले जात आहे, असे सांगून काही धार्मिक नेतेही या प्रकरणात आगीत तेल ओतण्याचे काम करताहेत, असा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.