सायबर सुरक्षेबाबत सावधानता बाळगावी – ब्रिजेश सिंह

सायबर सुरक्षा

मुंबई  : सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करणे हे आज गरजेचे आहे. याबाबत सतर्क राहून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी आज केले. मंत्रालयातील परिषद सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता दोन दिवसीय सायबर सुरक्षा जागरुकता अभियान राबविण्यात येत आहे. आज या अभियानाचे उद्घाटन श्री. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

नवीन पिढी ही माहिती तंत्रज्ञानाच्या खूप जवळ आहे, असे सांगून श्री. सिंह पुढे म्हणाले, सायबर सुरक्षेबाबत योग्य ज्ञान, बाळगावयाची सावधानता सर्वांपर्यंत पोहोचविणे हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठीच पोलीस रेझिंग डे च्या निमित्ताने सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. अनोळखी ई-मेल्स उघडू नयेत, वायरस असणाऱ्या पेनड्राईव्ह अथवा इतर उपकरणांचा वापर टाळावा व त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही सतर्क राहून अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

पोलीस अधीक्षक श्री. राजपूत यांनी यावेळी सर्वांचे स्वागत करुन सायबर सुरक्षा जागरुकता अभियान याबाबत माहिती दिली. श्री. खोत यांनी आधार विषयी माहिती दिली. या अभियानासाठी पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, कॉन्स्टेबल नवनाथ देवगुडे, विवेक सावंत आदींनी परिश्रम घेतले. उद्या दि. 6 जानेवारी रोजीही हे अभियान होणार आहे.