सावधान! लग्नासाठी मुलगा पसंत नसल्याने मुलीने कोल्ड्रिंकमधून दिले विष

यवतमाळ : मुला-मुलींची पसंती असल्याशिवाय पालकमंडळी त्यांचे लग्न जमवत नाहीत. पसंत नसेल तर मोकळेपणाने सांगितलेही जाते. पण काही पालक मुला-मुलींचे लग्न बळजबरीने ठरवतात. पण यवतमाळ जिल्ह्यातून नापसंतीने लग्न लावणाऱ्या मुलीने एक अजब कृत्य केले आहे. मुलीला मुलगा पसंत नसल्याने तिने चक्क मुलाला बोलावून एका हॉटेलमध्ये कोल्ड्रींक्समधून विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार नेर शहरातील माळीपुरा परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनूसार, बाभुळगाव तालुक्यातील एका गावातील तरुणीचे नेर तालुक्यातील किशोर नामक मुलासोबत लग्न जुळले होते. पण त्या मुलीला मुलगा किशोर पसंत नव्हता. दरम्यान त्या मुलीने किशोर याला नेर शहरातील माळीपुरा परिसरात भेटायला बोलावले. त्यावरून किशोर त्या ठिकाणी पोहोचला. यावेळी त्या मुलीसह चौघांनी संगनमत करून किशोरला जिवे मारण्याचा कट रचला. हॉटेलमधील एका कोल्ड्रिंक्सच्या बाटलीत चक्क विष टाकण्यात आले.

दरम्यान, किशोरला ते कोल्ड्रिंक्स पिण्यास जबरदस्ती करण्यात आली, मात्र त्याची इच्छा नव्हती. तरी देखील त्याला गोड बोलून नात्याच्या शप्पथ देवून कोल्ड्रिंक्स पिण्यास भाग पाडले. यात किशोरची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी दि. १ मे रोजी किशोर याने नेर पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता नेर पोलिसांनी या प्रकरणी त्या मुलीसह चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

महत्त्वाच्या बातम्या