सावधान..! औरंगाबादेत पुन्हा वाढतोय कचरा

औरंगाबाद: शहरात दररोज ३५० मेट्रिक टनच्या वर कचरा जमा होतो. कचरा संकलनासाठी मनपाने बंगळूर येथील रेड्डी या खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे. मात्र डोअर टु डोअर कलेक्शनमध्ये कंपनी अपयशी ठरली आहे. कारण आजही शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येतो. स्लम भागांमध्ये नागरिक उघड्यावर कचरा फेकतात. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तसेच पावसामुळे डेंग्यू, मलेरियाच्या पार्श्वभूमीवर रोगराईची भिती देखील निर्माण झाली आहे.

शहरातील मुख्य चौक, रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. मात्र महानगरपालिकेचे अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सिटी चौक, गजानन मंदिर परिसर,औरंगपुरा, एपीआय कॉर्नर, महालक्ष्मी चौक, पुंडलीक नगर परिसर, उस्मानपुरा, दर्गा रोड परिसर, सूतगिरणी चौक या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावर कचरा फेकला जातो. उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना पालिकेकडून दंड लावला जात असतांना देखील यात तिळमात्र फरक पडलेला नाही.

हा कचरा तीनतीन दिवस पडून असतो. माझा कचरा माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत महापालिका गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात औरंगाबाद शहराने २६ वे स्थान मिळवले असले तरीही आजही अनेक भागांमध्ये कचरा रस्त्यावर पडून असल्याचे दिसते. एकीकडे शहर सुशोभीकरणासाठी नवनवीन कल्पना राबवत असतांनाच दुसऱ्या बाजूला साचलेल्या कचऱ्यामुळे शहराची छवी खराब होत आहे याकडे पालिकेने कानाडोळा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP