काळजी घ्या ! कोयना धरणाचे ६ वक्री दरवाजे उघडले; तब्बल ‘इतका’ विसर्ग सुरु

koyna dam

कराड : संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरु झाला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, जळगावसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने कहर माजवला असून हाताशी आलेलं पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा दमदार पावसामुळे धरणे तुडुंब भरले असून विसर्ग सुरु करण्यात आले आहेत.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसाने धरणातील पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणातील पाणी नदीपात्रात विसर्ग करणेचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला. कोयना धरणाचे सहाही वक्री दरवाजे दुसऱ्यांदा एक फुटाने उचलून कोयना नदीपात्रात 9214 कयुसेक तर पायथ्या वीजगृह मधून 1050 कयुसेक असा एकूण 10264 कयुसेक पाणी विसर्ग सुरु केला आहे.

105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 103.84 टीएमसी पाणी साठा आहे. दरम्यान, धरणातून विसर्ग सुरु केल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच नदीपात्रात जाणे टाळावे अशी सूचना देखील करण्यात आली आहे. यासोबतच, धरणात पाण्याची आवक वाढल्यास दरवाजे आणखी उचलेले जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

कोणत्या जिल्ह्यात आज-उद्या अलर्ट ?

हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया ला यलो अलर्ट दिला आहे.

तर उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या