fbpx

मतदानाच्या दिवशी सजग राहा, अजित पवारांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : चौथ्या टप्यातील मतदानाला आता काही तासच उरले आहेत, त्यामुळे चौथ्या टप्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये कसून प्रचार केला जात आहे. मावळ मतदारसंघात देखील राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचाराच्या फेऱ्या लावण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मावळ मतदार संघातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एकत्र बोलावून मार्गदर्शन करण्यात आले आहे.‘‘निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी ४८ तासांचा अवधी राहिला आहे, त्यामुळे जोमाने काम करा आणि मतदानाच्या दिवशी सतर्क राहा,’’ असा सल्ला पवारांकडून देण्यात आला आहे.

पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आकुर्डीमधील हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, ईव्हीएम मशिनबाबत निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत गंभीर तक्रार आल्या आहेत, त्यामुळे मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही बूथवर होतो. त्याचप्रमाणे येथेदेखील पोलिंग एजंट सकाळी सहा वाजता पोचायला हवेत. गेल्या दोन दिवसांपासून उकाडा वाढला आहे, त्यामुळे त्याचा विचार करून नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

तसेच पवार पुढे म्हणाले की, शहरात लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कमी मतदान होते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे वेळ आहे, त्यामुळे त्यादृष्टीने सभेचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.